Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीस्पर्धेत धावण्यापूर्वी अभ्यासच महत्त्वाचा

स्पर्धेत धावण्यापूर्वी अभ्यासच महत्त्वाचा

माझ्या लहानपणापासून हिंदीतली एक म्हण मी ऐकत आलो आहे ‘वो तो लंबी रेस का घोडा है’, याचा अर्थ लहानपणी कधीच कळत नाही. पण तो मोठेपणी लक्षात येतो. बरोबरचे काही विद्यार्थी चमकतात आणि नाहीसे होतात. तर फारसे न चमकणारे नंतर दहा-बारा वर्षांनी चमकू लागतात. त्यांचा दमसास खूप वेगळा असतो म्हणून ते दहा वर्षे टिकून राहतात. छोटी धाव घेऊन जिंकणारे एकाच स्पर्धेत जिंकतात आणि त्यांचेवर हातातील चषक आयुष्यभर सांभाळून ठेवण्याची जबाबदारी येते. म्हणूनच शैक्षणिक स्पर्धेत धावण्यापूर्वी आपली धाव किती व कशी याचा अंदाज घेतला तर खूप फायदा होतो.

वर्षभर नियमित अभ्यास करणारा, अभ्यास समजून घेण्यावर भर देणारा, केवळ एमसीक्यू पाठ न करता पाठय़पुस्तक वाचून स्वत:च्या नोट्स काढण्यावर भर देणारा कोणताही विद्यार्थी चांगला इंजिनियर बनतो, उत्तम डॉक्टर तर नक्कीच बनतो, यशस्वी मॅनेजर बनायला पंचाईत नसते. याला ‘लंबी रेस का घोडा’, समजायला हरकत नसावी.

या उलट फक्त एमसीक्यू पाठ करून जेईई, नीट वा सीईटीत मार्क मिळवणारा विद्यार्थी कदाचित चांगलं कॉलेज मिळवेल. त्या बाबतीत पहिल्याला तो मागेही टाकेल. मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सततचे बदलांना तोंड देताना त्याची दमछाक होण्याची शक्यता आहे.

या सगळय़ातील खरे लंबी रेस के घोडे कोणते? ते ना आई वडील सांगू शकत, ना करिअर कौन्सिलर. मला काय मिळवायचे आहे हे ज्याच्या मनात ठाम असते, त्यासाठीची तयारी करण्याकरता कष्ट घेण्याची जिद्द असते, तीच एक सुरुवात असते. थोडेफार गमतीत सांगायचे झाले तर संपूर्ण शैक्षणिक वर्षांचे नियोजन गणपती पूर्वी करणारा विद्यार्थी या गटात मोडतो. हे नियोजन करण्यापूर्वी अर्थातच त्याला संपूर्ण अनुक्रमणिका व पुस्तकाचा आवाका समजून घ्यावा लागतो. हातातील दिवस आणि करावयाची अभ्यासाची पाने यांचा हिशोब सहज लागतो. हा सुद्धा एक प्रवासच असतो. या प्रवासात दमणूकही होते, तसाच आनंदही मिळतो.

या उलट चमकदार कामगिरी करणारा विद्यार्थी स्वत:च्या फक्त वेगाकडे लक्ष ठेवतो. किती वेगाने किती अभ्यास करून किती चॅप्टर्स मी संपवले हा हिशोब कदाचित परीक्षे पुरता उपयोगी पडतो. पडेलच असे कधी नसते. एक छोटे उदाहरण देऊन सांगायचे तर, बारावीची शास्त्र शाखेची सर्व विषयांची परीक्षा तीन आठवडे चालते. तर जेईई, नीट किंवा सीईटीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, गणित किंवा बायो हे तीन विषय फक्त तीनच तासात संपवावे लागतात. यासाठी सखोल अभ्यासच उपयोगी पडतो. २०२४ किंवा २०२५ साली ज्यांना अशा परीक्षा द्यायच्या आहेत त्यांनी स्पर्धा सुरू होण्याआधी याचा विचार करावा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments