सीयूईटीचे परीक्षार्थी वाढले
नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे एनटीए घेण्यात येणाऱ्या केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा पदवीपूर्व सीयूईटी-युजी परीक्षेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत चार लाख अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांकडून ‘सीयूईटी-युजी’ परीक्षेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या परीक्षेसाठी देशातून १३ लाख ९९ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज आणि शुल्क भरले आहे.
देशातील विद्यार्थ्यांना केंद्रीय, सरकारी, खासगी, अभिमत अशा विविध विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासासाठी विविध विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. या सर्व प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात. त्याचप्रमाणे वेळही जातो. य़ा पार्श्वभूमीवर विविध परीक्षांऐवजी एकच प्रवेश परीक्षा होण्यासाठी ‘यूजीसी’ने गेल्या वर्षी ‘सीयूईटी-युजी’ प्रवेश परीक्षा सुरू केली.
गेल्या वर्षी देशभरातील एकूण ९० विद्यापीठांनी ‘सीयूईटी-युजी’मध्ये सहभाग घेतला होता. त्यातील ४४ केंद्रीय विद्यापीठे होती. यंदाची ‘सीयूईटी-युजी’ २१ मेपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम मुदत ३० मार्चला संपली असून, यंदाच्या परीक्षेत एकूण २४२ विद्यापीठांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे यूजीसी अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांनी ‘ट्विट’च्या माध्यमातून दिली आहे.
