Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीशिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे / विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत; शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न पिढी घडविणे ही काळाची गरज असून शिक्षक आणि पालकांनी यासाठी योगदान द्यावे. तसेच विद्यार्थ्यांनी नव्या काळातील आव्हाने ओळखून पारंपरिक विचार न करता नवे आणि आवडीचे क्षेत्र निवडावे,असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अल्पबचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, सुनंदा वाखारे, कमलाकांत म्हेत्रे, रणजित शिवतारे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन देशाचा नावलौकिक उंचवावा. यशाची शिखरे गाठताना शाळेला किंवा शिक्षकांना विसरू नये. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करताना चांगले मित्र निवडावे. नैतिकतेचा विसर पडू देऊ नये आणि नियमित व्यायाम करावा. व्यसनापासून दूर रहात आवडते छंद जोपासावे. आपल्या उत्तम कामगिरीत सातत्य राखत शाळेचा आणि देशाचा नावलौकिक उंचवावा, असा संदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी भाषेतूनही शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे. मातृभाषा महत्वाची असून जागतिक संवादाची भाषा म्हणून इंग्रजीलाही महत्व देण्याची गरज आहे. त्यासाठीही शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे, असेही श्री.पवार म्हणाले. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी व्हावे यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाची पुढील वर्षांपासून 100 टक्के अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परंपरागत शिक्षण पद्धतीत रोजगार देण्याची क्षमता आणि विद्यार्थ्याच्या संशोधक वृत्तीला कमी वाव होता. नव्या शैक्षणिक धोरणात या बाबींवर भर देण्यात आला आहे. शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना पुढील वर्षांपासून पहिलीच्या आधीची तीन वर्षे महत्वाची मानली जाणार आहेत. या तीन वर्षात मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर  आहे.  प्रास्ताविकात श्री.चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात 3 हजार 668 शाळा असून प्रत्येक गणातून 2 शिक्षकांची निवड पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी व्हावे यासाठी जिल्हाभर मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.उपमुख्यमंत्री श्री.पवार आणि पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनाही यावेळी पुरस्कार देण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments