शाळा प्रशासन दरवर्षी पुस्तके व गणवेश यात ठराविक वाढ करत असते
ऐरोली सेक्टर १९ येथील न्यू होरिझॉन पब्लिक स्कूल एनएचपी या शाळेने शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये केलेली पुस्तके, गणवेशाची दरवाढ आणि शालेय शुल्कवाढ अवाजवी असल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी बुधवारी शाळा प्रशासनाचा विरोध करत निदर्शने केली. यावेळी पालकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, मात्र रबाळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्यांना रोखले. शाळा प्रशासनानेही प्रवेशद्वार बंद करून पालकांना भेटण्यास प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यास नकार दिला.
शाळा प्रशासन दरवर्षी पुस्तके व गणवेश यात ठराविक वाढ करत असते. परंतु यावर्षी शाळेने केलेली पुस्तकांची दरवाढ, गणवेश दरवाढ, शालेय शुल्क वाढ व पुस्तके ठराविक विक्रेत्याकडूनच घेण्याची सक्ती करण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. हे सरकारी नियमांच्या विरोधात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात पालकांनीही २७ मार्च रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी यांच्यासमोरही प्रश्न मांडले होते. तेव्हा शाळा प्रशासन व पालकांचे प्रतिनिधी यांमध्ये चर्चा झाली होती. २८ मार्च २०२३ रोजी शाळेला या सर्व बाबतीत पालकांशी संवाद साधून अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
परंतु शाळा प्रशासनाने अद्याप पालकांना बोलावले नाही. त्यामुळे पालकांनी संतप्त होऊन शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन केले. या संदर्भात शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षारक्षकांनी प्रसारमाध्यमांना प्रवेशद्वारावरच अडवत काहीही बोलण्यास नकार दिला.
