‘शाळा माझी न्यारी’…
लातूर जिल्हा परिषद शाळेतील हजारो विद्यार्थी स्मार्ट करण्याचा न्यारा उपक्रम
70 टक्के महाराष्ट्र हा ग्रामीण भागात वसलेला आहे. जिल्हा परिषदेची शाळा या भागातील शिक्षणाचा कणा आहे. मात्र येथील शिक्षणाबाबत कायमच ओरड दिसून येत असते. जर येथील शाळा स्मार्ट (Smart School) झाल्या तर नक्कीच उज्ज्वल भवितव्य असणारी पिढी तयार होईल हाच विचार घेऊन क्रिएटिव्ह फाउंडेशन यांनी राजमाता जिजाऊ ‘शाळा माझी न्यारी’ हा उपक्रम राबवला आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड देत पारंपारिक खेळ स्मार्ट क्लासरूम आणि ऑनलाईन शिक्षण यासह अनेक उपक्रम या शाळेत राबवण्यात येणार आहेत. प्रथम चरणात औसा तालुक्यातील तीन शाळांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेत 50 लाख रुपये खर्चून अद्यावत यंत्रणा उभी करण्यात येत आहे. औसा मतदारसंघातील 70 शाळेमध्ये हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की, समोर दिसतं ते चित्र नक्कीच चांगलं नसतं. कारण निधीचा अभाव, मोडकळीला आलेल्या इमारती, सुविधांचा अभाव, कर्मचाऱ्यांची अनास्था. हे चित्र महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सर्वत्र पहायला मिळत असतं. इतकं होऊनही जिल्हा परिषदेची शाळा ही ग्रामीण भागातील शिक्षणाचा मुख्य कणा आहे. येथेच जर सर्वांगीण शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली तर या भागातील विद्यार्थी नक्कीच उज्वल भवितव्य तयार करू शकतील, असा विश्वास असल्यामुळे क्रिएटिव्ह फाऊंडेशन लातूर यांनी एक पाऊल उचललं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच निधी देत सुधारणा घडवून आणणं. औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह क्रिएटिव फाउंडेशन यांनी एक उपक्रम सुरू केला आहे. जिल्हा परिषदेच्या स्मार्ट शाळेच्या या उपक्रमाला नावही देण्यात आलं आहे. या उपक्रमाचं नाव आहे, शाळा माझी न्यारी उपक्रम.
शाळा माझी न्यारी म्हणजे काय?
औसा विधानसभा मतदारसंघातील सरकारी शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा विकसित करणं. सैद्धांतिक शिक्षणाला प्रात्यक्षिक शिक्षणाची जोड देणं, शाळा, केंद्रीय विद्यालयं, कॉन्व्हेंट शाळांच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या चित्रकला, गायन, वादन, क्रीडा अशा विविध कलागुणांना वाव मिळवून देणं. पाठ्यक्रम शिक्षणासोबत जीवनावश्यक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं. विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमाबाहेरील शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं. शाळांना फिट इंडिया, स्वच्छ भारत, खेलेगा इंडिया, जितेगा इंडिया इत्यादी अभियानाशी जोडणं. योग्य करिअर पाथ निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणं यासाठी औसा विधानसभा मतदारसंघातील प्रायोगिक तत्त्वावर दत्तक घेण्यात आलेल्या या जिल्हा परिषदेत शाळेत कॉम्प्यूटर लॅब, सुसज्ज ग्रंथालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान लॅब, क्रीडा केंद्र, स्मार्ट क्लास रुम, जीवन कौशल्ये प्रशिक्षण केंद्र, संस्कार केंद्र, खुली व्यायामशाळा, स्वच्छ आणि सुंदर शाळा, संगीत केंद्र, आर्ट गॅलरी, हरित शाळा आणि आत्मनिर्भर शाळा आशा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकी एका शाळेवर किमान 50 लाख रुपये खर्च येणार असून प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आलेल्या या तीन शाळानंतर मतदारसंघातील जवळपास 77 जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
