Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती

डॉ. प्रकाश महानवर हे सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर कार्यरत आहेत. 1 जून 1967 रोजी जन्मलेल्या प्रा. महानवर हे पॉलिमर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. सोमवारी (2 ऑक्टोबर) ते पदभार स्वीकारतील. डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचा कार्यकाळ 5 मे 2023 रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रजनीश कामत यांचेकडे संबंधित पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

डॉ. महानवर यांची निवड कशी झाली?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांदे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरु निवड समिती गठीत केली होती. विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रमोद पडोळे, हैदराबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई. सुरेशकुमार (युजीसी प्रतिनिधी) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सच‍िव विकास चंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी यांनी डॉ. प्रकाश महानवर यांची कुलगुरुपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

डॉ. महानवर हे पॉलिमर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. डॉ. प्रकाश महानवर हे शिक्षण क्षेत्रात 28 वर्षांपासून कार्यरत असून मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील पॉलिमर आणि सरफेस इंजिनिअरिंग या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तिथे ते मानव संसाधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही कार्यरत होते. डॉ.प्रकाश महानवर यांनी केमिकल व प्लास्टिक टेक्नॉलॉजीमधून बीएससी आणि एमएस्सी केले असून पॉलिमर क्षेत्रात पीएचडी केली आहे. त्यांच्या नावे पॉलिमर क्षेत्रात संशोधनपर 5 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट्स असून 2 पेटंट्ससाठी अर्ज केलेला आहे.

112 संशोधनपर शोधनिबंध, राष्ट्रीय उद्योगासाठी सल्लागार म्हणून कार्य

आजपर्यंत त्यांनी 112 संशोधनपर शोधनिबंध लिहिले असून यातील अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी आजपर्यंत 32 संशोधनपर प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 21 विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली असून 9 विद्यार्थी पीएचडी करत आहेत. अनेक राष्ट्रीय उद्योगासाठी त्यांनी सल्लागार म्हणूनही कार्य केले आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य आहेत. महाराष्ट्र अकॅडेमी ऑफ सायन्स आणि द कलर सोसायटीचे ते फेलो आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments