नेमकी कशी झाली अभ्यासाला सुरुवात?
पहिल्यांदा कोणत्या कारणास्तव मानवाने घेतलं शिक्षण?
आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीसाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. काही लोक असं म्हणतात की, तुम्ही एक वेळेस उपाशी राहू शकता, पण शिक्षणाशिवाय नाही. म्हणजेच आजच्या काळात जर काही सर्वात महत्त्वाचं असेल, तर ते शिक्षण आहे. आता आपल्या खर्या प्रश्नाकडे वळूया, ही अभ्यासाची कला माणसांमध्ये नेमकी कशी विकसित झाली? नेमकं कोणत्या गोष्टीमुळे मानवाने अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि त्याची गरज का भासली? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कधीपासून झाली अभ्यासास सुरुवात?
असं पाहिलं तर अभ्यासाचा इतिहास हा अनेक वर्ष जुना आहे. धार्मिक मान्यतांनुसार, वाचन आणि लेखन हे काही हजार वर्षांपूर्वी सुरू झालं. पण विज्ञान शिक्षणाबाबत काही वेगळेच तर्क लावतो. बीबीसीच्या अहवालानुसार, संशोधन अभ्यासक मारियान वुल्फ म्हणतात की, अभ्यास ही एक कला आहे जी सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी सुरू झाली. अभ्यासाची सुरुवात मोजणीपासून झाली असल्याचं संशोधक मारियान वुल्फ म्हणाल्या. आपल्याकडे किती दारुची भांडी आहेत? किंवा किती मेंढ्या आहेत? यापासून मोजणीला सुरुवात झाली. जेव्हा वर्णमाला तयार झाली तेव्हा त्याद्वारे मानवाने काहीतरी वाचून ते लक्षात ठेवण्याची आणि माहिती मिळवण्याची कला शिकली.
अभ्यासात मेंदूचं महत्त्वाचं योगदान
भारतात जेव्हा एखादं मूल अभ्यासात खूप चांगलं असतं, तेव्हा लोक म्हणतात की, या मुलाची बुद्धी खूप कुशाग्र आहे आणि हा खूप हुशार आहे. त्याच वेळी, जेव्हा मूल अभ्यासात कमजोर असतं, तेव्हा लोक म्हणतात की, त्याचं डोकं तितकं चालत नाही. त्यामुळे शिक्षणाचा आपल्या डोक्याशी आणि बुद्धिशी खूप संबंध असतो. तुम्ही जे काही वाचता किंवा शिकता ते तुमच्या मनातून घडतं. वास्तविक, मेंदूमध्ये दहा अब्जांहून अधिक न्यूरॉन्स असतात आणि त्यांच्याद्वारे मेंदू माहितीची देवाणघेवाण करतो. म्हणजे वाचलेल्या गोष्टींचा अभ्यास आणि लक्षात ठेवण्यासाठीही या न्यूरॉन्सची गरज असते.
अभ्यासाचं महत्त्व
केवळ अभ्यासानेच मनुष्य कुशल होतो. या जगात कोणीही जन्मत: विद्वान नसतो, तो केवळ अभ्यास करूनच शिकतो आणि मोठा होतो. ज्याप्रमाणे एका साधूला शिक्षण घेण्यासाठी एका ठिकाणी राहून अभ्यास आणि कठोर तप करावा लागतो, त्याचप्रमाणे अभ्यासाशिवाय कोणीही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. स्वतःच्या विकासासाठी अभ्यास हे सर्वोत्तम साधन मानलं जातं. जर एखाद्याला आपलं जीवन सुधारायचं असेल तर त्याने अभ्यास करणं खूप आवश्यक आहे.
