नासाचा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांसाठी, पण सोबत जाणार अधिकाऱ्यांचे कुटुंब?; शासकीय पैशांची उधळपट्टी कशासाठी?
हा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांसाठी आहे की, अधिकाऱ्यांच्या पर्यटनासाठी असा प्रश्न विचारला जात आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी नासाला भेट देणार असून, यासाठी बीड जिल्हा परिषदेच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. मात्र, नासाचा हाच दौरा आता वादात सापडला आहे. यावरून जिल्हा परिषदेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, आंदोलन देखील करण्यात येत आहे. नासाच्या दौऱ्यात अधिकाऱ्यांचे कुटुंबातील सदस्य देखील जात असल्याने, हा दौरा विद्यार्थ्यांसाठी आहे की, अधिकाऱ्यांच्या पर्यटनासाठी असा देखील प्रश्न विचारला जात आहे. बीड जिल्हा परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. ज्यात 11 विद्यार्थी अमेरिकेतील नासामधील स्पेस सेंटरला भेट देतील. विशेष म्हणजे या अभ्यास दौऱ्यात विज्ञान आणि गणित विषयाशी संबंधित तज्ञ सोबत जाणे अपेक्षित आहे. मात्र, असे असताना मनमानी कारभार करत जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी शासनाच्या पैशाचा गैरवापर करत असून, आपल्या कुटुंबियांसह या अभ्यास दौऱ्यावर जाण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे याचाच विरोध करण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी आज बेशरमांचे फुल टाकून आणि कागदी विमान हवेत उडून आंदोलन केले आहेत. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतराळाची माहिती व्हावी यासाठी नासाच्या अभ्यास दौऱ्याच आयोजन करण्यात आले आहे. मात्र, यामध्ये विद्यार्थ्यांसोबत जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी देखील आपल्या कुटुंबीयांसह जात आहेत. त्यामुळे शासनाच्या पैशाचा असा गैरवापर करून परदेशी पर्यटनासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांचा आंदोलकांनी विरोध केला आहे. तर, अभ्यास दौरा फक्त विद्यार्थ्यांसाठीच आहे. त्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाच व्हावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
अधिकाऱ्यांच्या कुटुंबावर पैशांची उधळपट्टी कशासाठी?
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा त्याचबरोबर संशोधन वृत्तीचा विकास व्हावा आणि शास्त्रज्ञाच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. ज्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेच्या माध्यमातून यासाठी निवड करण्यात आली. मात्र, आता याच विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौऱ्यात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कुटुंबावर ही पैश्यांची उधळपट्टी कशासाठी? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. त्यामुळे आता आरोपांवर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका आणि प्रतिकिया काय असणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
