मातांना ३२१ कोटी ५७ लाख रुपयांचे ऑनलाईन वितरण
मुंबई / केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रुपयांचे ऑनलाइन वितरण करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, आमदार आशिष शेलार, केंद्रीय सचिव इंदेवर पांडे, राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल आदींसह महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होते.
अंगणवाडी सेविकांच्या विम्यापोटीचा हप्ता केंद्र शासन भरणार – स्मृती इराणी
केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या की, राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२८०० रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरेल. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शहरी भागामध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी एक हजार पाळणाघरे सुरू करण्यास केंद्र शासनामार्फत लवकरच आदेश निर्गमित करण्यात येतील. आपदग्रस्त महिलांसाठी राज्यांमध्ये 40 पेक्षा जास्त वन स्टॉप सेंटर सुरू आहेत. या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून 38 हजार संकटग्रस्त महिलांना मदत झाली. राज्य शासनाच्या निर्भया फंडाबाबत केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.
