Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीमहाराष्ट्रात सुराज्य निर्माण करण्याच्या दिशेने एकत्रित वाटचाल करूया – उपमुख्यमंत्री अजित पवार...

महाराष्ट्रात सुराज्य निर्माण करण्याच्या दिशेने एकत्रित वाटचाल करूया – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

महाराष्ट्रात सुराज्य निर्माण करण्याच्या दिशेने एकत्रित वाटचाल करूया – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

मुंबई / युगपुरुष, छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत. सह्याद्रीच्या कडे-कपारीतील अठरा पगड मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी संघर्षातून स्वराज्याची निर्मिती केली. ते रयतेचे राजे होते. शेतकऱ्यांचे कैवारी होते. कलावंतांचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरच महाराष्ट्रात सुराज्य निर्मितीच्या दिशेने एकत्रित वाटचाल सुरु आहे, ही वाटचाल यापुढेही वेगवान पद्धतीने सुरू राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले आहे. शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्यातील घराघरात साजरा करतानाच, जनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करण्याचे आवाहन करुन त्यांनी राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवजयंती निमित्त दिलेल्या शुभसंदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित करुन हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य स्थापन केले. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. स्वराज्य निर्मितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातील प्रत्येक पिढीने प्रसंगी प्राणांचे बलिदान देऊन जपला. महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष जन्मला हे आपले भाग्य आहे. शिवाजी महाराजांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हित, जनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून घेतला होता. राज्यातील महायुतीचे सरकार देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना, धोरणांना, कारभाराला आदर्श मानून काम करत राहील, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments