काय सांगता! चक्क पीएचडी चोरीला, थेट राज्यपालांकडून दखल; संशोधन रद्द करण्याचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर / चक्क पीएचडी (PHD) चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन थेट राज्यपाल कुलपती रमेश बैस (Ramesh Bai) यांनी या पीएचडीचे संशोधनच रद्द केल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएचडी ‘कॉपी पेस्ट’मुळे रद्द झाली आहे. किशोर निवृत्ती धावे असे ‘कॉपी-पेस्ट’ करणाऱ्याचे नाव असून, धावे यांनी राज्यशास्त्र विषयाच्या प्रबंधात 51 ते 65 टक्के चोरी केल्याचे समोर आले आहे. अधिक माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत राज्यशास्त्र विषयात किशोर निवृत्ती धाबे यांनी दहा वर्षांपूर्वी पीएच.डी पदवी प्राप्त केलेली होती. ‘किनवट तालुक्यातील आदिवासी नेतृत्त्व आणि आदिवासीसाठींच्या कल्याणकारी ध्येय धोरणांची ‘अंमलबजावणी’ या विषयांतर्गत त्यांनी 2013 मध्ये पीएच.डी. प्राप्त झाली. सदरील शोध प्रबंधात वाङ्मय चोरी करण्यात आली असल्याची तक्रार कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे पुरुषोत्तम रामटेके यांनी पुराव्यासह दाखल केली होती. डॉ. मारोती तेगमपुरे व देशमुख यांच्या शोधप्रबंधातील मजकूर चोरण्यात आल्याची तक्रार होती. या तक्रारीनुसार डॉ. धर्मराज वीर, डॉ. शूजा शाकेर व डॉ. मृदुल निळे या तीन सदस्यांची विभागांतर्गत चौकशी समिती (इन्स्टिटयूशनल अॅकेडमिक इंटिग्रेटेड पॅनेल) नेमण्यात आली.
सुनावणीनंतर विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय मान्य
समितीने शोधप्रबंधात 51 टक्के वाड्ःमय चौर्य झाल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विद्यापीठस्तरीय सत्यशोधन समितीनेही चौकशी केली. चा चौकशीत 65 टक्के वाड्:मयचौर्य केल्याचा अहवाल देण्यात आला. यानंतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व विद्या परिषद बैठकीतही सवार्नुमते हा अहवाल स्विकारुन पीएच.डी. रद्द करण्यास संमती देण्यात आली. या नंतर गेल्या महिन्यात कुलपती रमेश बैस यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी झाली. विद्यापीठाच्यावतीने प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा व विधि अधिकारी किशोर नाडे यावेळी उपस्थित होते. या सुनावणीनंतर विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय मान्य करुन पीएच.डी. रद्द करण्याचा निर्णय कुलपती यांनी मंजूर केला आहे.
विद्यापीठाच्या 65 वर्षांच्या इतिहासातील पहिलीच घटना…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत आतापर्यंत वेगवेगळ्या विषयात अनेकांनी पीएचडी मिळवली आहे. यासाठी संशोधन करून पीएचडीधारक पदवी मिळवत असतात. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएचडी ‘कॉपी पेस्ट’मुळे रद्द करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
