जुन्या अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम वर्षामध्ये प्रवेश मिळावा, अमरावती विद्यापिठासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन
जुन्या अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम वर्षामध्ये प्रवेश मिळावा यासाठी अमरावती विद्यापिठासमोर युवक काँग्रेसने आंदोलन केलं.
अमरावती : जुन्या अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या वर्गामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा, या मागणीसाठी अमरावती युवक काँग्रेसकडून (Amravati Yuvak Congress) आंदोलन करण्यात आलं. अमरावती विद्यापिठाने (Amravati University) एका जुन्या प्रणालीतून नवीन प्रणालीमध्ये सुरु केलेली शैक्षणिक वाटचालीमधील ही एक अपवादात्मक परिस्थिती आहे. त्यामुळे या परिस्थितीत विशेष बाब म्हणून विद्यापिठाने फुल कॅरीऑनचा निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे. (Amravati Yuvak Congress Andolan)
अमरावती विद्यापिठासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन
ही वस्तुस्थिती लक्षात घेता, तसेच विद्यापिठाने (Sant Gadge Baba Amravati University) कॅरीऑन देण्याची परंपरा पाहता या वर्षी विशेष बाब म्हणून जुन्या अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या वर्गामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा, अशी अमरावती युवक काँग्रेसची मागणी आहे. यासोबतच, विद्यापिठाच्या या बाबतच्या होणाऱ्या विलंबामुळे अनेक विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती खालावलेली आहे. त्यामुळे यामध्ये काही अघटीत प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी विद्यापीठ जबाबदार राहील, असा इशारा अमरावतीयुवक काँग्रेसने (Yuvak Congress) दिला आहे.
‘जुन्या अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम वर्षामध्ये प्रवेश मिळावा’
शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये अंतिम वर्षाला फक्त सी.बी.सी.एस. प्रणालीचे (CBCS) विद्यार्थी प्रवेशित राहणार आहे आणि त्याप्रमाणे महाविद्यालयामध्ये शिक्षण दिले जाणार आहे. जुन्या अभ्यासक्रमाची बॅचला यावर्षी द्वितीय वर्ष पूर्ण करून अंतिम वर्षात प्रवेश मिळाला आहे. यामध्ये द्वितीय अथवा प्रथम वर्षाला अनुत्तीर्ण झालेले तसेच विद्यापिठाच्या नियमाप्रमाणे अंतिम वर्षाच्या प्रवेशाला पात्र न ठरलेले हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.
विद्यापिठाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला
यापैकी जे विद्यार्थी द्वितीय वर्षाची परीक्षा पास करुन पुढील वर्षी अंतिम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयामध्ये येतील त्यांना जुन्या अभ्यासक्रमाच्या वर्गामध्ये प्रवेश मिळणार नाही. कारण पुढच्या वर्षी महाविद्यालयामध्ये फक्त सी.बी.सी.एस. प्रणालीचेच वर्ग उपलब्ध असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना या वर्षीच म्हणजे 2022 ते 2024 मध्येच अंतिम वर्षाला प्रवेश देऊन महाविद्यालयीन नियमित विद्यार्थी म्हणून त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य ठरणार आहे. असे न केल्यास पुढील वर्षी महाविद्यालयामध्ये जुन्या अभ्यासक्रमाचे स्वतंत्र वर्ग सुरु ठेवणे विद्यापिठावर बंधनकारक राहणार आहे.
