जिल्हा परिषदेमध्ये १९,४६० पदांची भरती
आरोग्य विभागाकडील १०० टक्के आणि इतर विभागांकडील ८० टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.
मुंबई : ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट‘क’मधील सरळसेवेची तब्बल १९ हजार ४६० पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्याची जाहिरात शनिवारी प्रसिद्ध होईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी केली. आरोग्य विभागाकडील १०० टक्के आणि इतर विभागांकडील ८० टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. मार्च २०१९ मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, करोनाची साथ यामुळे ही परिक्षा होऊ शकली नाही. यानंतर शासनाच्या विविध विभागांद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत आता ही भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवारी जाहिरात प्रसिद्ध होणार असून, ५ ते २५ ऑगस्टदरम्यान उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल, असे महाजन यांनी सांगितले.
