Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीदहावीला तीन, बारावीला दोन भाषा अनिवार्य; सीबीएसई बोर्डाचा प्रस्ताव

दहावीला तीन, बारावीला दोन भाषा अनिवार्य; सीबीएसई बोर्डाचा प्रस्ताव

दहावीला तीन, बारावीला दोन भाषा अनिवार्य; सीबीएसई बोर्डाचा प्रस्ताव

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.(CBSE)  माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर मोठे बदल करत दहावीपर्यंत दोनऐवजी तीन भाषांचा अभ्यास करणं अनिवार्य करण्याचा प्रस्ताव सीबीएसईकडून सादर करण्यात आला आहे. त्यापैकी किमान दोन भाषा भारतीय असणे आवश्यक आहे. तर 11वी आणि 12 वीच्या स्तरवर एकाऐवजी दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार असल्याचंही सीबीएसईकडून सांगण्यात आलं आहे. त्यापैकी किमान एक मूळ भारतीय भाषा असली पाहिजे, असंही प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे.

दहावीला तीन, बारावीला दोन भाषा अनिवार्य

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना आता तीन भाषा आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात येईल. दहावीच्या विद्यार्थ्यांनी तीन त्यापैकी किमान दोन भाषा भारतीय असणे आवश्यक असेल. तर अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एकाऐवजी दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार असून त्यापैकी भारतीय भाषा असणे आवश्यक आहे. सीबीएसईने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शाळांना या संदर्भात माहिती देऊन सूचना मागविल्या होत्या. शाळांकडून सूचना मागविल्यानंतर हे बदल लागू केले जाणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून हे बदल करण्यात येत असल्याचे सीबीएसईच्या या प्रस्तावात म्हटले आहे.

दहावीला दहा विषयांचा अभ्यास

भारतीय भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) हे मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी दहा विषयांचा अभ्यास करावा लागतो. आता त्यापैकी तीन भाषा आणि सात मुख्य विषय असतील. सध्या तीन मुख्य विषय आणि दोन भाषा असं विषयांचं स्वरूप आहे. नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे अनिवार्य असेल. बंधनकारक भाषांपैकी दोन भारतीय असणंही आवश्यक असेल. गणित-संगणक, सामाजिक शास्त्र, विज्ञान, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण हे सात मुख्य विषय असतील.

बारावीच्या अभ्यासक्रमात सहा विषय

अकरावी-बारावीच्या स्तरावर दोन भाषा आणि चार मुख्य विषयांचा समावेश असेल. दोन भाषांमध्ये किमान एक भारतीय असणे बंधनकारक आहे. एक भाषा आणि चार विषय धरून पाच विषयात विद्यार्थ्यांना उत्तीर्ण व्हावे लागते. बारावीतील सर्व विषयांचे चार गटात वर्गीकरण केले जाईल. भाषा, कला, शारीरिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण, सामाजिक विज्ञान, आंतरविद्याशाखीय विषय, गणित, विज्ञान हे विषय या चार गटांत विभागण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments