समाजाच्या अमर्यादित गरजा त्याच्या मर्यादित साधनांचा पर्याप्त उपयोग करून भागविण्याचे प्रयत्न करण्यासाठी अस्तित्वात आलेली किंवा आणलेली आणि उत्पादन, विभाजन व भविष्यकाळासाठी तरतूद करणारी आर्थिक घटकांची व्यवस्था होय. आताच नमूद केल्याप्रमाणे आपणास अर्थव्यवस्थेची व्याख्या तर कळली पण या लेखामध्ये आपण अर्थव्यवस्था म्हणजे काय? ही संकल्पना नेमकी काय आहे? त्याचे प्रकार कसे पडतात? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या.
अर्थव्यवस्थेची उत्क्रांती
अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण इतिहासाचा आढावा घेतल्यास असे आढळते, की मृगया, मेंढपाळी व कृषी या आर्थिक व्यवसायांचे ज्या काळात समाजात प्राधान्य होते, त्या काळात संपत्तीचे उत्पादन व वाटप यांची व्यवस्था कमी गुंतागुंतीची होती. बँका व शेअर बाजाराची प्रगती झालेली नव्हती. जे उत्पादन करावयाचे ते उपभोगाकरिता ही मूलभूत प्रेरणा होती. जमीन, भांडवल व श्रमिक ही उत्पादनांची साधने काबीज करण्याची ईर्ष्या औद्योगिक क्रांतीनंतर वाढली. मोठ्या प्रमाणावरच्या कारखानदारीमुळे नवा भांडवलदारवर्ग पुढे आला. नव्या गरजा निर्माण झाल्या. श्रमिकांची कौशल्ये व गतिक्षमता कमी झाली. व्यवसायांची विविधता वाढली आणि आर्थिक व्यवस्था अधिक गुंतागुंतीची झाली.
या नव्या आर्थिक व्यवस्थेवर साहजिकच भांडवलदारांचा प्रभाव असल्याने उत्पादनसाधनांवरील स्वामित्वाचे केंद्रीकरण आणि त्यायोगे श्रमिकांचे शोषण व संपत्तीची विषम वाटणी या गोष्टी वाढीस लागल्या. याचीच प्रतिक्रिया म्हणून अनिर्बंध अर्थव्यवस्थेचे हे दोष सुधारावेत या हेतूने समाजवादी तत्त्वज्ञानाचा उदय झाला. समाजवादी किंवा समाजकल्याणकारी अर्थव्यवस्थांचा पुरस्कार करणाऱ्या विचारवंतांनी ‘संपत्तीची अमर्याद खासगी मालकी आणि संपत्तीचे उत्पादन करण्यास आवश्यक असलेली साधने व भांडवल यावरील खासगी मालकी, म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था.
भांडवलशाही अर्थव्यवस्था काही काळपर्यंत आर्थिक प्रगती करते; परंतु कालांतराने भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या योगे आर्थिक प्रगती न होता अवनती होऊ लागते, अशी मीमांसा केली आहे. त्यामुळे नव्या अर्थव्यवस्था सुचविताना प्रामुख्याने खासगी संपत्तीवर समाजाचे सम्यक् नियंत्रण राहील, अशा उपाययोजनांवर भर दिला गेला आहे.
अर्थव्यवस्थांचे प्रमुख प्रकार
आधुनिक काळातील अर्थव्यवस्थांचे स्थूलमानाने मुक्त वा अनिर्बंध, फॅसिस्ट, समाजवादी ध्येयाची संमिश्र अर्थव्यवस्था व साम्यवादी अर्थव्यवस्था असे चार प्रकार पडतात.
