AMD बंगळुरूमध्ये 5 वर्षांत 400 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार, 3 हजार इंजिनीयर्ससाठी नोकरीची संधी
गुजरातमधील गांधीनगर येथे भारतात उद्योगांना चालना देण्यासाठी सेमिकॉन इंडिया या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
AMD, Micron, Cadence, Lam आणि इतर उद्योगक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सेमीकंडक्टर परिषदेत उपस्थिती लावली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी टेक मेजर असणाऱ्या AMD ने भारतात 400 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. तसेच पुढील पाच वर्षांमध्ये बंगळुरूमध्ये जवळपास 3,000 रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, AMD हे बंगळूरमध्ये सर्वात मोठे R&D केंद्र स्थापन करणार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे. हे केंद्र या वर्षाच्या अखेरीस सुरु होणार असल्याचा आशावाद देखील या कार्यक्रमादरम्यान व्यक्त करण्यात आला आहे. AMD चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मार्क पेपरमास्टर यांनी म्हटलं की, एएमडीची भारतात मागील काही वर्षांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. 2001 मध्ये फक्त काही कर्मचाऱ्यांपासून सुरुवात झाली आणि सध्या 6,500 हून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. तसेच त्यांनी या प्रगतीचे श्रेय सरकारचे पाठबळ आणि देशातील व्यावसायिकांनी केलेल्या सहाय्याला दिले आहे. येत्या काही काळामध्ये भारतात मोठी गुंतवणूक होणार असून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचं या कार्यक्रमादरम्यान सांगण्यात आलं आहे. तसेच भारतातील उच्च शिक्षित तरुणांना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी ही योजना राबण्यात येत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
सरकारकडून 50 टक्के आर्थिक मदत मिळणार
भारताला सेमीकंडक्टर हब बनवण्यासाठी सरकारकडून 50 टक्के आर्थिक मदत देण्यात येण्याची घोषणा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली आहे. तसेच जगभरातील अनेक कंपन्या या भारताकडे सेमीकंडक्टर हब म्हणून पाहत आहेत, त्यामुळे भारत ही संधी हातातून जाऊ देणार नाही असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं आहे.
