अबुधाबीत होणार IIT दिल्लीचे पहिले संकुल, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या
अबुधाबी मध्ये आयआयटी दिल्लीचे (IIT Delhi) पहिले संकुल स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे.अबुधाबी मध्ये आयआयटी दिल्लीचे (IIT Delhi) पहिले संकुल स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. हा करार शिक्षण मंत्रालय आणि अबुधाबीचा शिक्षण आणि ज्ञान विभाग (ADEK) यांच्यात करण्यात आला आहे. अबुधाबी येथील आयआयटी दिल्लीचे संकुल ज्ञानाच्या सामर्थ्याचा लाभ घेण्यासाठी एक पूर्णपणे नवी ओळख प्रस्थापित करेल. तसेच भारताच्या शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा एक नवा अध्याय सुरू करेल असे मत केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकासमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी व्यक्त केलं.
दोन्ही देशामधील ज्ञानाची देवाणघेवाण वाढणार
यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अडेकचे अंडर सेक्रेटरी मुबारक हमद अल मेहिरी आणि यूएईमधील भारतीय राजदूत सुंजय सुधीर आणि आयआयटी दिल्लीचे संचालक प्रोफेसर रंगन बॅनर्जी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. सध्या सुरु असलेल्या यूएई-भारत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराला (CEPA) बळ देणाऱ्या या सामंजस्य करारातून दोन्ही देशांमधील शिक्षणाची उत्कृष्टता आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढणार आहे. तसेच दीर्घकालीन आर्थिक वृद्धी आणि शाश्वत विकासाचे कारक म्हणून मानवी भांडवलातील गुंतवणूक यांना प्राधान्य देण्याचा दृष्टीकोन प्रतिबिंबित होत आहे.
देशाच्या शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा एक नवा अध्याय
अबुधाबीमध्ये आयआयटी दिल्लीचे पहिले संकुल उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य करारामुळे भारताच्या शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा एक नवा अध्याय सुरू होत असल्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवभारताचा नवोन्मेष आणि प्रावीण्य यांचा दाखला देणारे आयआयटी दिल्लीचे यूएईमधील संकुल हे भारत-यूएई मैत्रीचा नवा अंक असेल असेही प्रधान म्हणाले. अबुधाबीमधील आयआयटी दिल्लीचे संकुल परस्परांची समृद्धी आणि जागतिक कल्याण या दोहोंसाठी ज्ञानाच्या सामर्थ्याचा लाभ देणारी एक पूर्णपणे नवी ओळख प्रस्थापित करेल, असे त्यांनी सांगितले. यामुळं भारताच्या शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा एक नवा अध्याय देखील सुरु होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आयआयटी दिल्ली- अबुधाबी ही संस्था मोहम्मद बिन झायेद युनिवर्सिटी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, खलिफा युनिर्वसिटी, न्यूयॉर्क युनिवर्सिटी अबुधाबी, टेक्नॉलॉजी इनोवेशन इन्स्टिट्युट आणि हब 71 यांसारख्या प्रमुख संस्थांच्या सहकार्याच्या माध्यमातून पूरक कार्यक्रम उपलब्ध करेल. तसेच अत्याधुनिक संशोधन सुविधा उपलब्ध करण्यात येतील. स्थानिक स्टार्टअप प्रणालीची प्रगती करुन अबुधाबीमधील शैक्षणिक, संशोधनविषयक आणि नवोन्मेष परिसंस्था बळकट करेल असेही प्रधान म्हणाले.
आयआयटी दिल्ली-अबुधाबी संकुल 2024 पासून आपले शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करणार आहे. पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी कार्यक्रम राबवेल तसेच शाश्वत ऊर्जा आणि हवामान अभ्यास तसेच कंप्युटिंग आणि डेटा सायन्स यांच्याशी संबंधित संशोधन केंद्र सुरू करेल, अशी अपेक्षा आहे. आयआयटी दिल्ली- अबुधाबीकडून ऊर्जा आणि शाश्वतता, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, गणित आणि कंप्युटिंग आणि अभियांत्रिकी, विज्ञान आणि मानव्य या विषयांचे इतर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातील असे प्रधान म्हणाले.
