आत्मनिर्भर महिला स्वत:सोबत समाजाचेही कल्याण करतात – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मुंबई / आपल्या देशातील आत्मनिर्भर स्त्रिया स्वतःच्या कल्याणाबरोबरच परिवार आणि समाजाचेही कल्याण करतात आणि अशा दृढनिश्चयी लोकांसाठीच केंद्र सरकार काम करत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गावोगावी पोहोचवणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील अनेक लाभार्थींशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रधानमंत्री यांनी मुंबईतील कांदिवली येथे राहणाऱ्या मेघना गुरव यांच्याशी संवाद साधत त्यांची माहिती घेतली. विविध योजनांमुळे मेघना यांच्यासह त्यांच्या बचतगटातील इतर स्त्रियांच्याही आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडल्याचे त्यातून उलगडत गेले. पूर्वी पदपथावर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या मेघना यांना मुद्रा योजनेतून कॅनरा बँकेमार्फत मिळालेल्या 90 हजार रुपयांच्या कर्जाने, त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आवश्यक ती सामग्री विकत घेऊन त्यांनी एकटीच्या हिंमतीवर व्यवसायाचा पसारा वाढवला. त्यानंतर मंजूर झालेल्या शैक्षणिक कर्जाच्या मदतीने त्यांच्या मुलाला परदेशी शिक्षणासाठी पाठवता आल्यामुळे एक ‘एकल माता’ म्हणून त्यांना विशेष समाधान झाले, असे मेघना यांनी यावेळी सांगितले. मेघना यांनी पीएम स्वनिधी योजनेतून कर्जाची उचल केली. योजनेची सुयोग्य माहिती त्यांना प्राप्त झालेली असल्याने हप्ते वेळेवर भरणाऱ्यास पुढे कमी दराने मिळणाऱ्या अधिक कर्जाची माहिती त्यांना आहे, व व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने त्यांनी तशा अधिक कर्जाची उचल करण्याचे नियोजनही केले आहे.
मुंबई दक्षिण मधील काँटनग्रीन परिसरातल्या शहीद भगतसिंग मैदानातही विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दूरदृश्यप्रणालीच्या माध्यतातून देशभरातल्या लाभार्थींशी साधलेल्या संवादाचे थेट प्रसारण करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टाँल लावण्यात आले होते. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांसाठी पात्रता असूनही, विकासाच्या प्रवाहात येता आले नाही, अशा लोकांना शासकीय योजनांचा विविध लाभ मिळावा, या उद्देशाने हाती घेतलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये 47 हजार 164 लाभार्थ्यांपैकी 23 हजार 668 पुरुष तर 22 हजार 845 स्त्रिया व 652 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी सहभाग घेतला आहे.
