नाशिक येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन
नाशिक / आजच्या डिजिटल युगात गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. या बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षित राज्य बनविण्याकरीता अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ व संसाधनानी परिपूर्ण अशा प्रकल्प निर्मितीची आखणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे 34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 च्या उद्घाटन समारंभा प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, सीमा हिरे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अपर पोलीस महासंचालक निखील गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. आरती सिंग, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक दत्ता कराळे, पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यात सायबर सुरक्षेसाठी कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर, टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्वेस्टिगेशन, सेंटर ऑफ एक्सलन्स, क्लाऊड आधारित डेटा सेंटर, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर यांचा समावेश असलेला 837 कोटींचा सायबर सुरक्षा प्रकल्प निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या प्रकल्पाला राज्यातील सर्व सायबर पोलीस ठाणे जोडण्यात येणार असून 24/7 कार्यरत असणाऱ्या कॉल सेंटरवर दूरध्वनी, मोबाईल ॲपच्या माध्यमातून किंवा पोर्टलवर सायबर गुन्ह्यांविषयक तक्रार नोंदवून या गुन्ह्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्यात येणार आहे. तसेच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच पोलीस दलातील मनुष्यबळ वाढविण्यासाठी पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदे भरण्याकरीता साधारण १७ हजार पदांची भरती प्रक्रियाही सुरु करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना घरबांधणीसाठी पूर्वीप्रमाणेच बँकामार्फत कर्ज घेण्याची योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला असून पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मोटार परिवहन विभागासाठी आस्थापना मंडळे गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
