हेल्मेटवर भारताचा झेंडा लावून खेळतात क्रिकेटर्स; पण असं करणं कायदेशीर आहे का?
सामना सुरू असताना अनेक खेळाडू फलंदाजीसाठी (Batting) मैदानात उतरताना हेल्मेट (Helmet) घालतात हे तुम्ही पाहिलंच असेल. यासोबत तुम्ही कधी भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवर भारताचा ध्वज (India Flag) पाहिलाय का? काही खेळाडू मात्र हेल्मेटवर तिरंगा लावत नाही. हेल्मेटवर झेंडा लावून खेळणं हा तिरंग्याचा अपमान आहे, असं अनेकांचं मत आहे. तर अनेकजण याला खेळाडूंची देशभक्ती म्हणतात. असं असताना, नियमानुसार हेल्मेटवर झेंडा लावणं कितपत योग्य आहे आणि झेंड्याबाबत नेमके नियम काय आहेत? याबद्दल जाणून घेऊया. खरं तर, हेल्मेटवर झेंडा लावण्याबाबत यापूर्वीही बरेच वाद झाले होते आणि त्यानंतर खेळाडूंना तसं करण्यास मनाई देखील करण्यात आली होती, तर हेल्मेटवर झेंडे बनवण्याबाबत काय नियम आहेत? ते जाणून घेऊया. या संदर्भात नेमका कोणता वाद निर्माण झाला होता? हे देखील समजून घेऊया.
यापूर्वी हेल्मेटवर झेंडा लावण्यास होती मनाई
ही घटना 2005 सालची आहे, जेव्हा खेळाडूंना तिरंगा वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. खेळाडू वापरत असलेल्या एक्सेसरीजवर तिरंगा लावू नका, असं त्यांना सांगण्यात आलं होतं. 2005 मध्ये बीसीसीआय आणि भारत सरकार यांच्यातील वादानंतर भारतीय खेळाडूंना त्यांच्या हेल्मेट रिस्ट बँड किंवा जर्सीवर कुठेही तिरंगा दाखवण्यास बंदी घालण्यात आली होती. यावेळी गृह मंत्रालयाने भारतीय ध्वज संहितेचा हवाला देत जर्सी किंवा किटवर तिरंग्याचा वापर करू नये, असं सांगितलं होतं. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, या वादानंतर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनीही हेल्मेटवरून तिरंगा काढला. त्यानंतर यावर बराच गदारोळ झाला, बराच वाद झाला. यानंतर बीसीसीआयने सरकारशी चर्चा केली आणि तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांनी तिरंगा वापरण्यास परवानगी दिली. यानंतर हेल्मेट इत्यादींवर पुन्हा तिरंग्याचा वापर सुरू झाला.
धोनीने तिरंगा लावणं केलं होतं बंद
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 2011 च्या विश्वचषकानंतर हेल्मेटवर तिरंगा लावणं बंद केलं होतं. त्यामागचं कारण असं सांगितलं जात होतं की, धोनी हेल्मेट ठेवताना ते जमिनीवर ठेवायचा, त्यामुळे त्याने हेल्मेटवर तिरंगा लावणं बंद केलं होतं.
