Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीराज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई /  राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दहावीत शिकणाऱ्या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या गृहविज्ञान व शरीरशास्त्र या विषयावरील एका सामायिक क्रमिक पुस्तकाचे राजभवन, मुंबई येथे आज प्रकाशन करण्यात आले. दहावीच्या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना विज्ञान भाग १ व २ या विषयांची प्रॅक्टिकल करताना अडचणी होत असल्यामुळे उपरोक्त दोन विषयांची पुस्तके तयार करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट या संस्थेच्या पुढाकाराने ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन व मिल्टन कंपनीच्या सहकार्याने शाळांमध्ये मोफत वितरणासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींचे विधेयक तयार करणाऱ्या संसदीय समितीचे आपण अध्यक्ष होतो. दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नको, तर सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असे राज्यपालांनी सांगितले. शासनाकडून दिव्यांग व्यक्तींना विविध ऑर्थोपेडिक उपकरणे तसेच श्रवणासाठी कॉक्लिअर इम्प्लांटसाठी देखील मदत केली जाते. रोटरी क्लबने केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके तयार करून न थांबता पुढील वर्गांसाठी लागणारी ब्रेल लिपीतील क्रमिक पुस्तके देखील तयार करून घ्यावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

कृत्रिम प्रज्ञा आणि मशीन लर्निंग सारख्या तंत्रज्ञानामुळे  विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीमध्ये क्रांतिकारक बदल घडत आहेत. या तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे दृष्टिहीन विद्यार्थी अधिक कार्यक्षम पद्धतीने माहिती मिळवू शकतात. दृष्टिहीन तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे तसेच त्यांच्या कौशल्य विकासाला चालना देणे गरजेचे आहे, असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, रोटरी जिल्हा ३१४२ चे गव्हर्नर मिलिंद कुलकर्णी व रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेटचे अध्यक्ष सुकुमारन नायर यांची भाषणे झाली. यावेळी उपस्थित दृष्टीबाधित विद्यार्थ्याने ब्रेल लिपीतील पुस्तकातील परिच्छेद वाचून दाखवला.या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला चेतना सिंह, ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनचे अरुण पारसकर, प्रकल्पप्रमुख पियूष नागदा, बलजिंदरसिंग कुमार, अजित चव्हाण, धनंजय सिंह, मिल्टन कंपनीचे अधिकारी तसेच बदलापूर येथील प्रगती अंध विद्यालयाचे दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments