मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध करुन देण्यास शिक्षण विभाग आग्रही; सप्टेंबरअखेरपर्यंत पाठ्यपुस्तकं मराठीत करण्याच्या विद्यापीठांना सूचना
राज्यातील विद्यापिठांना विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पाठ्येपुस्तकं ही मराठीत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मातृभाषेतून शिक्षण व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारने आग्रही भूमिका घेतली आहे. त्यासाठी नव्या शिक्षण धोरणांनुसार (Marathi) भाषेत पाठ्यपुस्तकं उपलब्ध करुन देण्यासंदर्भात निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने (Education Department) निर्णय घेतला. त्यामुळे आता सर्व(University) विज्ञान आणि वाणिज्य शाखेची पुस्तकं आता विद्यार्थ्यांना मराठीत देखील उपलब्ध होतील. त्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत विद्यापीठांना देण्यात आलीये. कारण हा निर्णय घेण्यात आल्यानंतरही अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत पुस्तक उपलब्ध झाली नसल्याचं चित्र आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत विज्ञान आणि वाणिज्य शाखेची मराठीत ट्रान्सलेट केलेली पुस्तकं विद्यापिठांना उपलब्ध करुन द्यावी लागणार आहेत.
अनेकदा मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये इंग्रजी अभ्यासक्रम लवकर आत्मसात करण्यास अडचण निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेकदा अडचणी निर्माण होतात. विद्यार्थ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन शासनाने मातृभाषेतून शिक्षण घेण्याची आग्रही भूमिका घेतलीये. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजण्यास मदत होईल. अभ्यासक्रमातील विविध बाबींच्या संदर्भासाठी मराठीत ट्रान्सलेट केलेली ही पुस्तकं उपयोगात पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात मातृभाषेतून पुस्तकं उपलब्ध होणार
मुंबई आयआयटीकडून विद्यापीठांना मराठीत भाषांतर केलेली पुस्तकं उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी उच्च शिक्षण विभागाने मुंबई आयआयटी सोबत सामंजस्य करार देखील केले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने विद्यापीठांना भाषांतर करण्याचे निर्देश दिले आहेत. पण अर्ध शैक्षणिक वर्ष पूर्ण होत आलं तरीही विद्यार्थ्यांना भाषांतर केलेली पुस्तकं उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे ही पुस्तकं लवकरात लवकर विद्यापीठांना उपलब्ध करुन द्यावी लागणार आहेत. शिक्षण विभागाच्या या सूचनेमुळे भाषांतराचे काम वेगाने सुरु करण्यात आलंय. तसेच या सूचनेमुळे विद्यापीठांना पुढील दोन आठवड्यांमध्ये विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील किमान दहा पुस्तकं तरी भाषांतरीत करावी लागणार आहेत. तसे न झाल्यास शासनाकडून योग्य ती पावलं उचलण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय.
शिक्षण विभागाकडून परित्रपक जारी
उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या संदर्भातले परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी विद्यापिठांना निर्देश दिले आहेत. सध्या राज्यात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना मराठीतून पाठ्यपुस्तकं उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
