‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते जलावतरण
मुंबई,/ माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये (एमडीएल) बांधणी करण्यात आलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आले.‘महेंद्रगिरी’ ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत सातवी आणि एमडीएलकडून बांधण्यात आलेली चौथी स्टेल्थ विनाशिका आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ.सुदेश धनखड यांनी या युद्धनौकेचे नामकरण केले होते. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार यामिनी जाधव, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार आणि ‘एमडीएल’ चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय नौदल आणि ‘एमडीएल’चे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी उपराष्ट्रपती श्री. धनखड म्हणाले की, ‘महेंद्रगिरी’ या निलगिरी श्रेणीतील सातव्या स्टेल्थ विनाशिकेचे जलावतरण म्हणजे भारतीय नौदलाच्या अचल वचनबद्धतेचा आणि असामान्य निर्धाराचा दाखला आहे. निलगिरी श्रेणीतील विनाशिकांमध्ये बसवण्यात आलेली 75 टक्के उपकरणे आणि प्रणाली एमएसएमईकडून खरेदी करण्यात आली आहेत. ही बाब प्रशंसनीय आहे. ‘महेंद्रगिरी’ या प्रोजेक्ट 17 ए श्रेणीतील सातव्या युद्धनौकेचे जलावतरण म्हणजे देशाच्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पाबाबतच्या वचनबद्धतेचा योग्य दाखला आहे. भारताच्या नौदल सामर्थ्याच्या महत्त्वावर भर देत उपराष्ट्रपती श्री.धनखड म्हणाले की, अलीकडच्या काळात भारताची उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि जागतिक पातळीवरील उंचावलेले स्थान यामुळे भारताच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आधुनिक नौदलाची गरज आहे.विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणजे व्यापाराच्या आकारमानात वाढ असा अर्थ आहे. भारताच्या व्यापारापैकी 90 टक्के मालाची वाहतूक सागरी मार्गाने होते. ही बाब विचारात घेता आपला विकास आणि आपली प्रगती यामध्ये महासागरांचे महत्त्व अधोरेखित होते. वाढत्या क्षमतेबरोबरच जबाबदारीत देखील वाढ होते. हिंद-प्रशांत क्षेत्रात भारत एक संपूर्ण सुरक्षा पुरवठादार म्हणून उदयाला येत आहे. आज आपण एक सुरक्षित आणि त्याबरोबरच महासागरावरील शांततापूर्ण, नियम आधारित सागरी व्यवहार सुनिश्चित करणारे महत्त्वाचा जागतिक देश आहोत. हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षा आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील जास्त व्यापक सुरक्षा यांच्यासमोर विविध प्रकारची आव्हाने आहेत. भारतीय नौदल भारताच्या सागरी हितसंबंधाचे रक्षण, संवर्धन आणि त्यांना चालना देण्याचे काम अतिशय जबाबदारीने आणि पूर्ण क्षमतेने करत आहे. याबद्दल मी या दलाचे अभिनंदन करतो. या भेटीदरम्यान, उपराष्ट्रपतींनी ‘धरोहर’ या माझगाव डॉक्स लि. येथील हेरिटेज संग्रहालयालाही भेट दिली.
