Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीमुंबई मॅरेथॉन सर्वसमावेशक स्पर्धा – राज्यपाल रमेश बैस

मुंबई मॅरेथॉन सर्वसमावेशक स्पर्धा – राज्यपाल रमेश बैस

मुंबई मॅरेथॉन सर्वसमावेशक स्पर्धा – राज्यपाल रमेश बैस

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या नावनोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ

मुंबई / मुंबई मॅरेथॉन ही श्रीमंत – गरीब, शहरी – ग्रामीण, युवा – वृद्ध, स्त्री – पुरुष यांसारखे भेद मिटवणारी सर्वसमावेशक स्पर्धा आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा लोकशाही व धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांचा पुरस्कार करते. प्रत्येक गाव, शहर व महानगराची स्वतःची मॅरेथॉन सुरु झाल्यास त्यातून क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल व एकात्मता बळकट होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या नावनोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ राज्यपाल श्री. बैस यांच्या स्वतःच्या नावनोंदणीने करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार आशिष शेलार, मॅरॅथॉनचे आयोजक अनिल सिंह व विवेक सिंह, माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. मुंबई मॅरेथॉनना परोपकारी समाजकार्याची जोड दिल्याबद्दल राज्यपालांनी आयोजकांचे अभिनंदन केले. मॅरेथॉनच्या माध्यमातून गेल्या १९ वर्षांमध्ये ७०० अशासकीय सेवाभावी संस्थांनी सामाजिक उपक्रमांसाठी ३५६ कोटी रुपयांचा निधी उभा केला, त्यामुळे  देशाच्या सुदूर क्षेत्रातील दिव्यांग व इतर वंचित लोकांना लाभ झाला, असे राज्यपालांनी सांगितले. आज देशात जीवनशैली संबंधी मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग सारख्या समस्या वाढत आहेत. हे आजार टाळण्यासाठी नियमित चालणे, धावणे व व्यायाम करणे यासारखा स्वस्त उपाय दुसरा नाही असे सांगून मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयीन युवकांना प्रोत्साहित केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

आपण मुंबई मॅरेथॉनशी स्थापनेपासून जोडलो असल्याचे सांगून आज ही स्पर्धा जगातील पहिल्या दहा मॅरेथॉन पैकी एक झाली याबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. अबाल वृद्धांपासून सर्वजण सहभागी होत असलेली मुंबई मॅरेथॉन ही मुंबईचा सण झाली आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.यावेळी मुंबई, गोवा व गुजरात विभागाचे मेजर जनरल एच.एस. कहलों, नौदलाच्या महाराष्ट्र विभागाचे ध्वज अधिकारी रिअर ऍडमिरल ए एन प्रमोद, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक मिश्रा, मॅरॅथॉनचे आयोजक अनिल सिंह व विवेक सिंह, अभिनेते राहुल बोस, टाटा समूहाचे ब्रँड कस्टोडियन हरीश भट्ट, टीसीएसचे उज्वल माथूर, आयडीएफसी फर्स्ट बँकेचे मुख्य अधिकारी एम बालकृष्णन, माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments