Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीपदवीनंतर आता थेट पीएचडी करता येणार

पदवीनंतर आता थेट पीएचडी करता येणार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  प्रशासनाने येत्या शैक्षणिक वर्षापासूनच नवीन शैक्षणिक धोरणाची अमलबजावणी करण्याचे ठरविले असून, आता पदवीचा अभ्यासक्रम तीनऐवजी चार वर्षांचा असणार आहे. विशेष म्हणजे चार वर्षांचा हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर थेट पीएच.डी. ला प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्याची गरज राहणार नाही अशी माहिती प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाट यांनी माध्यमांना दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

केंद्र सरकारने 2020 साली नवीन शैक्षणिक धोरण लागू केले. राज्यात विद्यापीठस्तरावर येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अमलबजावणी होणार आहे. नवीन धोरणात शालेय शिक्षणात आणि उच्च शिक्षणात अनेक बदल अंतर्भूत आहेत. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आवश्यक तयारी केली आहे. आतापर्यंत पदवीचा अभ्यासक्रम हा तीन वर्षांचा होता. आता पदवीस्तरावरील अभ्यासक्रम चार वर्षांचा असणार आहे. तसेच आतापर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावरच पीएच. डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) या सर्वोच्च पदवीसाठी प्रवेश घेता येत होता. मात्र आता पदवीचे चार वर्षांचे शिक्षण घेतल्यावर थेट पीएच.डी.साठी प्रवेश घेता येणार आहे.

दरम्यान याबाबतीत बोलताना प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाट यांनी सांगितले की, विद्यापीठाअंतर्गत आता तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमासह चार वर्षांचा अभ्यासक्रम महाविद्यालयांना राबवावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया लवकरच सुरुवात केली जाईल. अभ्यासक्रमाची रचना, ज्यात उपलब्ध अभ्यासक्रम, महाविद्यालयांची जबाबदारी, प्रवेश प्रक्रिया याबाबतची सविस्तर रूपरेषा जाहीर केली जाईल. नवीन बदलात विद्यापीठाने संशोधनावरही भर दिला आहे. चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल, तर ते केवळ एक वर्षाचे असणार आहे.

पदवी अभ्यासक्रमाचे महाविद्यालयांना स्वातंत्र्य

तसेच चौथ्या वर्षात विद्यापीठ दोन पर्याय विद्यार्थ्यांसमोर ठेवेल. ज्यामध्ये सर्वसामान्य आणि दुसरे संशोधनावर आधारित असणार आहे. जे विद्यार्थी चौथे वर्ष संशोधनावर आधारित निवडतील, त्यांना पदवीनंतर थेट पीएच. डी. ला प्रवेश मिळू शकेल, परंतु त्यासाठी पदवीच्या शेवटच्या वर्षात 7.5 पेक्षा अधिक ग्रेड मिळणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे चार वर्षे कालावधीचा पदवी अभ्यासक्रम राबविण्याचे स्वातंत्र्य महाविद्यालयांना असणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments