महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालाची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. इयत्ता बारावीचा निकाल 31 मे 2023 रोजी जाहीर होण्याची शक्यता असून, जून 2023 च्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. थोडक्यात काय तर, Maharashtra State Board कडून परीक्षांच्या निकालांसंबंधीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.दरम्यान राज्यातील शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्या नंतर जु्न्या पेन्शनच्या मागणीमुळे काही दिवस शैक्षणिक काम बंद होते. या गोंधळात सहा-सात दिवस बारावीच्या उत्तरपत्रिका तपासल्या गेल्या नव्हत्या. यामुळे यंदा दहावी आणि बारावीचा निकाल विलंबाने लागेल अशी भीती पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये होती. परंतु आता मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकता
बोर्डाकडून दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालाची तारीखेची घोषणा लवकरात लवकर केली जाऊ शकते, असं सूत्रांनी म्हटलं आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी बोर्डाच्या या अधिकृत वेबसाईटवर आपला रोल टाकून निकाल पाहू शकतात.
किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली?
महाराष्ट्रात दहावी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या काळात घेण्यात आल्या होत्या. तर बारावीच्या परीक्षा या काळात पार पडल्या होत्या. यंदा परीक्षा ऑफलाईन आयोजित केल्या होत्या. यंदा जवळपास 15,77,256 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये 8,44,116 मुले आणि 7,33,067 मुलींचा समावेश होता. 5033 परीक्षा केंद्रांमध्ये या परीक्षांचं आयोजन केलं होतं. तर 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. बारावीच्या परीक्षांसाठी सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
