खासगी शाळांचे स्वत:चे मनमानी नियम विद्यार्थी आणि पालकांवर लादले जात आहेत, मात्र त्यावर शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे दिवसेंदिवस अशा खासगी शाळांचा मनमानी कारभार वाढत चालला आहे. ठाण्यातील आनंदनगर परिसरातील एका शाळेने उशिरा फी भरणाऱ्या पालकांना दर दिवसाला १०० रुपये व्याज लावले आहे. शिवाय या शाळांमधील असुविधांचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे, ते वेगळेच. आनंदनगर येथील मोठ्या खासगी शाळेचे सर्वसामान्य लोकांना आकर्षण असते. आपल्या पाल्याला या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून लाखो रुपये फी भरून अनेक पालकांनी प्रवेश घेतला, मात्र शाळांमधील अनेक त्रुटी हळूहळू समोर येऊ लागल्या आहेत. या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर दोन ते तीन टप्प्यांमध्ये फी भरली जाते, पण पालकांनी फी भरण्यास उशीर केल्यास त्यांना दर दिवसाला १०० रुपये प्रमाणे लेट फीच्या नावाखाली काही हजारांचे व्याज लावले आहे.
काही विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठीही अडवणूक करण्याचे प्रकार घडले आहेत. खासगी शाळांवर फी बाबत सरकारने नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
या शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी लाखो रुपयांची फी भरल्यामुळे सुविधा मिळणेही अपेक्षित आहे, मात्र शाळेतील वर्ग खोल्यांत एसी न लावणे, देण्यात येणाऱ्या पुस्तके व वह्यांचा दर्जा खालावलेला असणे, स्वच्छतागृहांची दुरवस्था अशा अनेक समस्या खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनाही आता भेडसावू लागल्या आहेत.
उशिरा फी देताय दर दिवशी १०० रुपये व्याज
RELATED ARTICLES
