शालेय शिक्षण संचालनालयाने रविवारी प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (इयत्ता 11 वी) च्या प्रवेशासाठी बहुप्रतिक्षित वेळापत्रक जाहीर केले. कॉमन एंट्रन्स प्रक्रिया 8 जूनपासून सुरू होणार आहे व त्यानुसार विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयांचे प्राधान्य भरू शकतील.केंद्रीकृत ऑनलाइन प्रणालीच्या तीन फेऱ्या असतील आणि त्यानंतर या वर्षी एक विशेष फेरी असेल. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश उपलब्ध झाला आहे त्यांना प्रवेश निश्चित करावा लागेल, अन्यथा ते सलग फेरीच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडतील. यावर्षी फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह अशी कोणतीही फेरी होणार नाही. तर उर्वरित विद्यार्थ्यांच्या चारही फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर दैनंदिन गुणवत्ता याद्या जाहीर केल्या जातील.
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एसएससी) निकाल जाहीर झाल्यानंतर, सर्वांचे प्रवेशाच्या सुरुवातीकडे लक्ष लागले होते. प्रवेश महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक अमरावती आणि नागपूर या पाच शहरांमध्ये ऑनलाइन होतात. सीएपीचे शून्य आणि पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, इयत्ता 11वीसाठी जागांची स्पर्धा सुरू होते.
दरम्यान, यंदाच्या कॉलेज प्रवेशाचे कट-ऑफ वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत मागील वर्षीच्या तुलनेत काहीच टक्के वाढ होऊ शकते पण पुण्यात यंदा ११, ४४१ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांच्या वर, पाच विद्यार्थ्यांना १०० टक्क्यांच्या वर तर १९,४५३ विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्क्यांच्या श्रेणीत गुण मिळाले आहेत. हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी सुद्धा याच शक्येतेची पुष्टी केली आहे. “अनेक विद्यार्थ्यांनी ९०, ९५ टक्के आणि अगदी १०० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले असल्याने कॉलेजांच्या कट ऑफवरही याचा परिणाम होईल. सर्व मोठ्या महाविद्यालयांमध्ये कट ऑफ निश्चितपणे १ ते २ टक्क्यांनी वाढेल.” असे परदेशी म्हणाले.
अकरावी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
१) दहावीची मार्कशीट (मूळ, व फोटोकॉपी)
२) आधार कार्ड, पॅनकार्ड (फोटोकॉपी)
३) पासपोर्ट साईज फोटो
४) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ व फोटोकॉपी)
५) रहिवासी पुरावा, घरचा पत्ता असलेला पुरावा (रेशनकार्ड, लाईट बिल)
६) जात प्रमाणपत्र (लागू होत असल्यास)
